खरंच हेच का `अच्छे दिन’ ?

खरंच हेच का `अच्छे दिन’ ?

महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी राज्यातल्या शेतकऱ्यांना अजिबात दिलासा देणारी ठरलेली नाही. सरकारच्याच आकडेवारीनुसार कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढल्या आहेत. यावर्षी १० महिन्यात २ हजार ४१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सर्व वाचलं आणि मन सुन्न झालं. तसा शेतीचा वारसा मला वडिलोपार्जितच मिळाला. एमबीएचं शिक्षण घेतलं. पण, शेती हा नेहमीच आवडता विषय राहिला. त्यात काही तरी नाविन्यपूर्ण करावं हाच ध्यास राहिला. निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळ आणि मालाला भाव नसणं, अशा एक ना दोन असंख्य अडचणींनी ग्रासलेला शेतकरी, कर्जमाफीच्या घोषणेनंतरही सावरू शकलेला नाही.

भाजपा-सेना सरकारला तीन वर्षं पूर्ण झाली आणि जाहिराती सुरू झाल्या. “होय हे माझं सरकार, मी लाभार्थी”. मग असं असतानादेखील राज्यात एवढया मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्त्या का करत आहेत, याचं कोडं काही करता सुटत नाही. आता आकड्यांकडे पाहिलं तर आकडे फारच भयानक आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या
ऑक्टोबर – १२५४ शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या. जानेवारी ते मे (पाच महिन्यांत) – १ हजार १६० शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या. दर महिन्याला सरासरी २४० शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या. दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या. २०१५ साली ३ हजार २२८ , २०१६ साली ३ हजार ६३ आत्महत्त्या झाल्या. तुलनेत यावर्षी आत्महत्त्येचा वेग अधिक दिसून येतो. या भयंकर स्थितीबाबत सरकार अवगत आहे. अलीकडे घेतलेल्या निर्णयापालिकडे सरकारकडे यावर काही उत्तर नाही. जून २०१७ ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, त्यानंतर देखील महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्या. याचाच अर्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर शेतकऱ्यांना भरवसा उरला नाही, असाच होतो.

नेमक्या उपाययोजना दिसतच नाहीत सरकार, विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांच्या संघटना, सर्वजण शेतकऱ्यांच्या स्थिती आणि आत्महत्त्यावर दररोज बोलत असतात. मात्र नेमक्या उपाययोजना काहीच होताना दिसत नाहीत. त्यामुळं हा विषय केवळ राजकीय फायद्यासाठी उचलला जातो, हा एकमेव निष्कर्ष निघतो. मात्र, यात मला राजकारण आणण्यात स्वारस्य नाही. शेतकऱ्यांचं कुठं तरी भलं व्हावं हाच एकमेव उद्देश्य. दरम्यान, २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीचा घोळ संपेल आणि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं सहकारमंत्र्यांनी सांगितलं. याआधीही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणत मोठा इव्हेन्ट सरकारने केला. पण ग्राउंड झिरोला येऊन पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात झिरोच दिसतोय. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की, आपण या अन्नदात्या शेतकऱ्यांचे काही देणं लागतो. या जगाच्या पोशिंद्याचा थोडा तरी विचार या सरकारने करावा आणि शेतकऱ्याला या कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढावं…

धीरज देशमुख
लातूर जिल्हा परिषद सदस्य
अध्यक्ष लातूर जिल्हा युवक काँग्रेस

Previous articleमनसेचा दणका! बिस्लेरी बाटल्यांवरील लेबल्स मराठीत 
Next articleबिस्लेरीवरून मनसे आणि स्वाभिमान संघटनेत श्रेयवादाची लढाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here