हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

मुंबई दि.२५ आगामी हिवाळी अधिवेशनात कोणताही दगाफटका होवू नये म्हणून संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीबरोबरच त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशास शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे.या कारणामुळे पुढील आठवड्यात होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. पोटनिवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन दिवसापूर्वी ‘मातोश्री’वर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले होते. या बैठकीत ठाकरे यांनी राणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केल्यानंतर त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीमध्ये अन्य उमेदवार देण्यावर एकमत झाले. शिवसेनेला डावलून राणेंना मंत्री करण्याची घाई करू नका, असा सल्ला कोअर कमिटीमध्ये एका ज्येष्ठ नेत्याने दिला. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडायचे असेल तर शिवसेनेला डिवचून चालणार नाही. त्याच दरम्यान गुजरातमध्ये निवडणुका असल्याने अशा परिस्थितीत शिवसेनेशी जुळवून घेण्याचा सुर या बैठकीत होता.या सर्वांचा विचार करून विस्तार अधिवेशनानंतर करावा असे मत अनेकांनी मांडले.कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था, शेतक-यावर झालेला गोळीबार आदी मुद्द्यांवरून नागपूर अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारची कोंडी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विरोध पत्करण्याऐवजी विस्तार नंतर करावा यावर एकमत झाले आहे.

नारायण राणे नाराज !

आमदारकीचा राजीनामा दिल्या नंतर भाजपच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापन करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देवूनही भाजपकडून येत्या ७ डिसेंबरला होणा-या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची आशा धुसर होत चालल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे संतप्त झाले आहेत. त्यातच भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याने राणे नाराज झाले असल्याची चर्चा आहे.

 

Previous articleनांदता येत  नसेल तर वेगळे व्हा!
Next articleमुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काॅग्रेसचा रास्ता रोको

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here