मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलच खरे लाभार्थी

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलच खरे लाभार्थी

उध्दव ठाकरे यांची टीका

सांगली दि.२६    सरकारला तीन वर्षपुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या ‘मी लाभार्थीच्या’ खोट्या जाहिराती करून राज्य सरकार जनतेला बधीर करीत आहे. शेतकऱ्यांच्या आजही अनेक समस्या असल्यामुळे जनता लाभार्थी झाली नाही तर जनतेने सत्ता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेच खरे लाभार्थी झाले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील कार्वे येथील शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारचा खरपूर समाचार घेतला. राज्यातील परिस्थितीमध्ये काही तरी नवीन बदल घडेल म्हणून जनतेने सरकार बदलले. पण परिस्थिती बदलली नाही. म्हणून परिस्थिती बदलायची असेल तर सांगली जिल्ह्यावर भगवा फडकवा. मी महाराष्ट्र भगवा करतो. असे घडले तरी मी मुख्यमंत्री होणार नाही, पण एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणारच अशी गर्जना त्यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सुटले नाहीत तर रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.

पहिल्या सरकारला कंटाळून अच्छे दिन येतील म्हणून जनतेने भाजपला भरभरून मते दिली. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. आता जेव्हा मी मागे बघतो तेव्हा कळतय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी खिल्लीही ठाकरे यांनी उडवली. महाराष्ट्र आहे तेथेच आहे. किंबहुना  त्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे. सरकारला चांगले सल्ले देणारे कोणी नाही. वीज दर कमी करण्यासाठी दिलेल्या  मुख्यमंत्रांच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवितात असे सांगून हे शेतकऱ्यांचे सरकार आहे की नाही असा सवाल केला. शेतकरी हा राजा आहे. त्यांचा कोणी छळ करून स्वतःला राजा समजत असेल तर हे संस्थान खालसा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिला.

Previous articleभाजप उमेदवाराच्या नावावर आजच्या बैठकीत अंतिम फैसला
Next articleआरेतील आदिवासींना आरे मध्येच मिळणार पक्की बैठी घरे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here