आ. प्रकाश सुर्वेंवर कारवाईच्या मागणीसाठी तृप्ती देसाईंचा पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा

आ. प्रकाश सुर्वेंवर कारवाईच्या मागणीसाठी तृप्ती देसाईंचा पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा

दोन दिवसांमध्ये कारवाईचे आश्‍वासन

मुंबई दि.२८    मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आपले जैविक वडील असल्याचा दावा करणा-या राज कोरडे या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज बोरीवली पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाची दखल घेत पोलीस सहायक आयुक्त नंदकिशोर मोरे यांनी आमदार सुर्वे, गणेश नायडु , विपुल दोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन यावेळी दिले.

राज कोरडे या तरुणाने शिवसेनेचे आमदार सुर्वे हे आपले वडील असल्याचा दावा करून  ,डीएनए चाचणी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची माहिती मिळताच सुर्वे यांच्या सागण्यावरून गणेश नायडु यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत मुंबईहुन सुरतला अपहरण केल्याचा आरोप राजने केला आहे. त्याची आई उज्वला यांनी याविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात धाव घेतली, पण पोलीसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. याबाबत गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे उज्वला यांनी कैफियत मांडली असता डॉ. पाटील यांनी पोलीसांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.परंतु बोरीवली पोलीसांनी ही तक्रार गणेशपुरी ( ठाणे) पोलीसांकडे वर्ग केली. तेथील पोलीसांनी सर्व जाब जबाब व तपास केला पण अपहरणाची घटना बोरीवली पोलीसांच्या हद्दीत घडली असल्याचे सांगत संबधीत फाईल मुंबई पोलीसांकडे पाठविली. मुंबई व ठाणे पोलीसांची चालढकल पाहता आपल्याला न्याय मिळणार नाही, असे वाटल्याने राज व त्याच्या आई उज्वला यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यानुसार आज मंगळवारी देसाई यांनी बोरीवली पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. सदर प्रकरणी संबधीतांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न केल्यास आमदार सुर्वे यांच्या घरासमोर ठिय्या तसेच नागपुर विधानभवना समोर आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी दिला. आक्रमक आंदोलनानंतर सहायक पोलीस आयुक्त मोरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी दोन दिवसात कारवाई करु, असे लेखी आश्‍वासन दिले.

Previous articleव्याज परतावा योजनेची अंमलबजावणी  जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश
Next articleपिडीतेला तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक निकाल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here