“इट का जवाब पथ्थर से मिलेगा”
काॅग्रेसचे कार्यालयावर हल्ला; कारवाईची विखे पाटील यांची मागणी
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या महानगरपालिकेच्या समोरील कार्यालयावर आज हल्ला झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस कार्यालयावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट त्यांनी केले आहे. हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे दिसत आहे. मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली.
काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड !: विखे पाटील
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरुपाचा होता. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे सांगतानाच विरोधी पक्षनेत्यांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.