न्याय न देणाऱ्या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवणार
अजित पवार हल्लाबोल
यवतमाळ : राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला या सरकारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे आणि आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत केला.
पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये कर्जमाफीच्या मुद्याला पुन्हा हात घातला. आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांची ७१ हजार कोटीची कर्जमाफी झाली. परंतु आत्ताचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख पे तारीख देत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू शकणार नाही कारण हे सरकारच कर्जबाजारी झाले आहे. खोटया जाहिराती देवून हे सरकार आपल्या करातून जमा होणाऱ्या पैशावर डल्ला मारताना दिसत आहे असा घाणाघाती आरोपही पवार यांनी केला.
पवार यांचे भाषण सुरु असतानाच वकील संघटनांनी सरकारच्याविरोधात हल्लाबोल करत जाहिर सभेच्याठिकाणी प्रवेश केला.त्यावेळी पवार यांनी वकील संघटनांचे स्वागत केले. यावेळी मोठया संख्येने वकील सहभागी झाले होते. राज्यातील सरकारच्याविरोधात एवढया मोठया प्रमाणात वकील संघटना उतरते त्याबद्दल पवारांनी त्यांना धन्यवाद दिले.
राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील कुणालाच हे सरकार न्याय देत नसल्याने जनतेच्या बाजुने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे जाहीर केले. हे सरकार जाती-जातीमध्ये धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप करताना सगळ्यांचा एकच धर्म,एकच जात म्हणजे शेतकरी आहे. आपण सर्व भारतीय आहोत असेही पवार यांनी सांगितले.
कोपर्डीच्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी केली.कारण असे कृत्य नराधम पुन्हा करण्याचे धाडस करणार नाहीत. कोपर्डीप्रकरणी आमच्या मुलीला न्याय मिळवून देणारे वकील अँड. उज्वल निकम यांचे पवार यांनी आभार मानले.खोटया जाहिराती,शेतकऱ्यांवर केला जाणारा लाठीमार, गोळीबार यावर सरकारचे वाभाडे काढले.गोळीबार झाल्यानंतर भाजपच्या नेत्याने केलेल्या वक्तव्याचाही समाचार पवार यांनी घेतला. त्यांनी सरकारला कशाची एवढी मस्ती आलीय. शेतकऱ्यांना असे बोलताना लाजा कशा वाटत नाही असा संतप्त सवालही केला. तुम्हा-आम्हाला गोळया घालायला हे सरकार निघाले आहे. आपल्या मुळावर हे सरकार उठले आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.