शेतकर्यांच्या प्रश्नासाठीच्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांना राग का ?
धनंजय मुंडे
यवतमाळ : शेतकर्यांसाठी कर्जमाफी, हमीभाव आणि बोंडअळीचे संकट हे शेतकर्यांचे प्रश्न घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करत असेल तर त्याचा मुख्यमंत्र्यांना राग का यावा असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर कारवाई करण्याची धमकी देण्यापेक्षा स्वतःच्या मंत्री मंडळातील विविध खात्यांमध्ये डल्ला मारणार्या भ्रष्टमंत्र्यांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
काल बीडमध्ये मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या हल्लाबोल आंदोलनावर टिका करतांना १५ वर्ष डल्ला मारणार्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. त्याला आज मुंडे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. हल्लाबोल यात्रेच्या दुसर्या दिवशी कळंबकडे प्रस्तान करतांना पत्रकारांशी बोलतांना मुंडे म्हणाले की, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी मागील साडे तीन वर्ष केवळ डल्ले मारण्याचे काम केले आहे. चक्की घोटाळ्यात २०५ कोटीचा डल्ला, एस.आर.ए योजनेत १ हजार कोटींचा डल्ला, एम.आय.डी.सी.च्या जमीन प्रकरणात डल्ला, तुरडाळीचा घोटाळा करून डल्ला, शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग असा एकही विभाग भ्रष्टाचाराने डल्ला मारल्या शिवाय सुटला नाही. मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातील माहिती तंत्रज्ञान विभाग हेच आता डल्ला मारण्याचे मोठे आगार झाले आहे. या विभागातील स्वतःच्या बगलबच्चांनी मारलेल्या डल्याची चौकशी करण्याची हिंम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असे आव्हान देतानाच विदर्भ, मराठवाड आणि राज्यातील लाखो शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. एकाही शेतकर्याला कर्जमाफी मिळाली नाही, मालाला हमीभाव नाही अशा वेळी शेतकर्यांसाठी आंदोलन करणार्या पक्षांना कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अशा धमक्यांना कधीही भिक घालणार नाही कितीही धमक्या दिल्या तरी आमचे शेतकर्यांसाठीचे आंदोलन आणि संघर्ष सुरूचा राहील असे ते म्हणाले. दुसर्या दिवशीच्या पदयात्रेत १३ कि.मी पायी चालत मुंडे व इतर नेत्यांनी अनेक शेतकर्यांशीही संवाद साधला.