सुप्रिया सुळेंनी घोटीतील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या
यवतमाळ : सरकारने आणि कृषी विभागाने योग्य ते मार्गदर्शन न केल्यामुळेच शेतकऱ्यांनी कापसावर औषध फवारणी केली आणि त्यात २२ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप बोंडअळीने हैराण झालेल्या घोटी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आपल्या व्यथा मांडताना केला.
पदयात्रेमधून जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांची घोटी गावामध्ये बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भेट घेत शेताची पाहणी करण्याचा आग्रह केला. त्यावेळी लगेच खासदार सुप्रिया सुळे यांनी तिथे असलेल्या सिध्देश्वर वाघमारे या शेतकऱ्याच्या शेतीला भेट देत पाहणी केली. या शेतकऱ्याने साडे पाच एकरामध्ये कापूस बियाणे पेरले होते. परंतु बोंडअळीने या शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान केले. साडेपाच एकरामध्ये २० क्विंटलपेक्षा जास्त कापूस पिकवत होता.
खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांची अगदी आस्थेने विचारपूस केली. यावेळी शेतकऱ्यांनी एकरी १५ हजार रुपये इतके नुकसान झाल्याचे सांगितले शिवाय खर्चाचा डोंगराने कर्जबाजारी झाल्याचे सांगितले. प्रशासनाकडे दीड महिना झाला तक्रारी देवून परंतु अदयाप पंचनामाच केला नसल्याच्या व्यथा त्यांनी मांडल्या. यावेळी खासदार सुळे यांना सरकारने कर्जमाफीही केली नाही. शेतमालाला योग्य भाव नाही, या सरकारला घालवा अशी मागणी करतानाच सरकारविरोधी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुम्हीच आमच्या शेतात आलात असेही शेतकऱ्यांनी सुळे यांना सांगितले.