हुकुमशाही मानसिकतेच्या सरकारला विरोध सहन होत नाही
खा. अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहका-यांच्या अटकेचा निषेध करून हुकुमशाही मानसिकतेच्या राज्य सरकारला विरोध सहन होत नाही मग तो स्वपक्षातून का होईना, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेल्या शेतक-यांच्या दुरावस्थेकडे आणि मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अकोला येथील शेतकरी जागर मंच आंदोलन करित आहे. आज माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या यशवंत सिन्हा, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांना पोलिसांनी अटक केली यावरून सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे सुरु असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
राज्यात १२ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेस पक्षच नव्हे तर सत्ताधारी भाजपातील अनेक नेत्यांना सरकारच्या अपयशाची जाणिव होते आहे. या जाणिवेतूनच अशा त-हेची आंदोलने होत आहेत. सरकारने संवेदनशिता दाखवून आत्मचिंतन करण्याची गरज लोकशाहीत असते परंतु हुकुमशाही मानसिकतेमुळेच या सरकारला कोणताही विरोध सहन होत नाही म्हणूनच विरोधकांच्या विरोधात पोलिसांकडून दंडेलशाही किंवा विरोधकांना अटक करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचे काम सुरु आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने या हुकुमशाहीचा विरोध करत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.