मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी येत्या १२ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती गोपीनाथ गडावर येत आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती यंदा विविध सामाजिक उपक्रम तसेच वंचित-पिडीत घटकांना मदतीचा हात देऊन साजरी होणार आहे. उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविणाऱ्या व्यक्तींचा गौरव देखील यावेळी करण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोपीनाथ गडावर होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, पशूसंवधर्न व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे तसेच अनेक खासदार व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
विविध सामाजिक उपक्रम
अपंगांना साहित्य व प्रोत्साहन पर अनुदानाचे वाटप, महिला बचतगटांना व्यवसायासाठी खेळते भांडवल, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण लघू उद्योगांना प्रोत्साहन देणारे विविध स्टाॅल्स, पदवीधर युवकांसाठी करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेंटरचा शुभारंभ आदी विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गोपीनाथ गडावर होणाऱ्या या सर्व कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी सुरू झाली आहे.