साडेनऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे ५ हजार कोटी रुपये जमा

साडेनऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर
कर्जमाफीचे ५ हजार कोटी रुपये जमा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य शासनाकडून कर्जमाफीसाठी आतापर्यत १७ लाख ४९ हजार शेतकऱ्यांसाठीचे १० हजार ३३२ कोटी रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. बँकांनी पडताळणी करुन त्यापैकी ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार १४१ कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले की, कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. आता या प्रक्रियेत सुलभता आली असून दररोज लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होत आहे. राज्य शासनाकडून कर्जमाफीसाठी आतापर्यत १७ लाख ४९ हजार शेतकऱ्यांसाठीचे १० हजार ३३२ कोटी रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. बँकांनी पडताळणी करुन त्यापैकी आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार १४१ कोटी रुपये जमा केले आहेत. त्यात आज सायंकाळपर्यंत आणखी भर पडेल. शासनाकडून उर्वरीत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच्या रकमा बँकांकडे वर्ग करण्यात येत असून लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीच्या रकमा जमा होतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश यावेळी या उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Previous articleराज्याचे महिला उद्योग धोरण जाहीर
Next articleकालबाह्य योजना बंद करून प्रशासकीय खर्च कमी करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here