२ हजार ६०६ बोटींपैकी २ हजार ६०५ बोटी मच्छिमारांसह सुखरुप !

२ हजार ६०६ बोटींपैकी २ हजार ६०५ बोटी मच्छिमारांसह सुखरुप !

ओखी चक्रीवादळ

मुंबई  : भारतीय हवामान खात्याकडून अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्री वादळाची माहिती मिळाल्यानंतर मंत्रालय नियंत्रण कक्षाने मच्छिमारांसह सर्व संबंधितांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या  राज्यातील २ हजार ६०६ बोटींपैकी २ हजार ६०५ बोटी मच्छिमारांसह सुखरुप परत आल्या असून एका बोटीचा पत्ता शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या उपाय योजनांची माहिती पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, नियंत्रण कक्षाचे संचालक राजीव निवतकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, चक्री वादळीची माहिती मिळाल्यानंतर मंत्रालय नियंत्रण कक्षाने कोकणातील सर्व जिल्हाधिकारी, तसेच मेरीटाईम बोर्ड, नौदल पोलिस, मत्स्यव्यवसाय विभाग, तटरक्षक दल आदींना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्यांना मुंबईत तैनात करण्यात आले होते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्यांनाही तयारीत राहण्यास सांगण्यात आले आहे.

समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या २ हजार ६०६ बोटींना परतण्यास सांगण्यात आले होते. त्यापैकी एक बोट वगळता सर्व बोटी सुखरुप परत आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातून गेलेल्या या एका बोटीचा शोध घेण्यात येत आहे. तसेच वादळामुळे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू यांच्यासह इतर राज्यातून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील सिंधुदुर्गमधील देवगड बंदरात ६३ बोटी (८०९ मच्छिमार), रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरांत ७९ बोटी (१ हजार ४७६ ) मच्छिमार) यांनी आश्रय घेतला आहे. या सर्व मच्छिमारांच्या राहण्याची, वैद्यकीय सुविधा तसेच परतीसाठी लागणाऱ्या डिझेलची व्यवस्था राज्य शासन करत आहे. तसेच तटरक्षक दलाच्या मदतीने या मच्छिमारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

 

Previous articleमागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केटचे कोर्सेस तयार करण्याचे निर्देश
Next articleप्रसाद लाड यांना विजयाची संधी तर; काॅग्रेस चमत्काराच्या आशेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here