प्रसाद लाड यांना विजयाची संधी तर; काॅग्रेस चमत्काराच्या आशेवर

प्रसाद लाड यांना विजयाची संधी तर; काॅग्रेस चमत्काराच्या आशेवर

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उद्या गुरूवार ७ डिसेबर रोजी पोटनिवडणूक होत असून, शिवसेनेसह अपक्षांच्या पाठिंब्यामुळे आणि नियोजनबध्द संपर्कामुळे युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांना विजयाची संधी आहे तर; काॅग्रेसचे उमेदवार दिलीप माने हे चमत्काराच्या आशेवर असले तरी मते फुटण्याच्या शक्यतेने दोन्ही काॅग्रेसचे नेते चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.

उद्या गुरूवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी विधानभवनात मतदान पार पडत आहे. युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यात ही लढत होत असली तरी संख्याबळ पाहता युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय सहज होवू शकतो अशी परिस्थिती असली तरी काॅग्रेस चमत्काराच्या भरवशावर आहे.विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३ , काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३ , अपक्ष ७ एमआयएमचे २ तर; सपा, रासपा,मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे आणि भारिपचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ मतांचा आकडा पार करावा लागणार आहे. भाजपचे प्रसाद लाड यांना शिवसेना आणि अपक्षांचा पाठिंबा असून, लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्याने विरोधकांची काही मते फोडण्यात त्यांना यश मिळू शकते. मतदान संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे , पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उद्योग मंत्री सुभाष देसाई ,बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकुर आणि त्यांचे आमदार सुपुत्र क्षितिज ठाकुर यांच्यासह ,सत्ताधारी आणि अपक्ष आमदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.

 विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-

भाजप-१२२ , शिवसेना-६३,काॅग्रेस-४२, राष्ट्रवादी-४१,शेकाप-३,बविआ-३,एमआयएम-२,अपक्ष-७, सपा-१,मनसे-१,रासपा-१,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-१-भारिप-१

Previous article२ हजार ६०६ बोटींपैकी २ हजार ६०५ बोटी मच्छिमारांसह सुखरुप !
Next articleकेंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here