विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार ?
नागपूर : ऑनलाईन कर्जमाफीत झालेला सावळा गोंधळ, कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होण्यास झालेला उशीर, बोंडआळीमुळे शेतक-यांचे झालेले नुकसान ,राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था आदी प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याच्या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
उद्यापासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने शेतक-यांचे प्रश्न गाजण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यासह विदर्भातील शेतक-यांचे बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान ,ऑनलाईन कर्जमाफीत झालेला घोळ, पावणे दोन महिने उलटूनही शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. समृध्दी महामार्ग ,राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था आदी प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचे कारण देत विरोधक मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
आज दुपारी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याची ,गट नेत्यांची बैठक विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानी होणार असून ,विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , आदी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत अधिवेशनामध्ये सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती आखण्यात येणार असून,विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद दुपारी ३ वाजता, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे.यामध्ये चहापावर करण्यात येणा-या बहिष्काराची अधिकृत घोषणा करण्यात येईल.