गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित
तीन वेळा कामकाज तहकूब
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर वेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले तर; गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल तर; काॅग्रेसचा जनआक्रोश मोर्चा नागपूरमध्ये निघाला आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुलाम नबी आझाद हे करणार आहेत. पवार यांचा आज वाढदिवस आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसह,काँग्रेस,शेकाप,सपा सहभागी झाले आहेत.
आज अधिवेशनाच्या दुस-या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापुर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले.” गली गली मे शोर है भाजप सरकार चोर है “शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या,अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. तर सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.