सरकारकडून सर्वच घटकांचा भ्रमनिरास झाल्याने हा एल्गार
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे
नागपूर : या भाजपा सरकारने महाराष्ट्रातील युवकांचा, विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा,व्यापाऱ्यांचा, समाजातील प्रत्येक घटकाचा भ्रमनिरास केला म्हणून हा एल्गार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नागपूर येथील जाहीर सभेमध्ये केले.
हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने खोटारड्या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी अलोट जनसागर नागपूरात दाखल झाला असून आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस असताना आणि त्यांची प्रकृती ठिक नसतानाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ते आज उपस्थित राहिले, आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं याबाबत आम्ही त्यांचे ऋणी आहोत.यवतमाळ ते नागपूर पायी प्रवास करताना शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या, उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. संपूर्ण चित्र वेदनादायक होतं. सत्ताधारी नेते सभागृहात म्हणतात की इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला हे स्टँप पेपरवर लिहून देतो. मग या हल्लाबोल आंदोलनासाठी एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित कसे? याचे उत्तर सरकारने द्यावे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
मागील ३ वर्षांत सरकारने फक्त आश्वासनांची पाने जनतेच्या तोंडाला पुसली. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली. विरोधी पक्षांच्यावतीने संघर्षयात्रा काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरसकट, तत्वतः निकषावर कर्जमाफी जाहीर केली. मात्र मागच्या चार महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा एक रूपयाही जमा झालेला नाही. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा आमचा निर्धार आहे. आपल्याला शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा मजबूत करायची आहे. धर्मनिरपेक्षता जोपासायची आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने एवढा मोठा हल्लाबोल मोर्चा काढला, काँग्रेसने जनआक्रोश मोर्चा काढला त्यामुळेच सरकारचे डोळे उघडले व बोंडअळीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. ३७ वर्षांपूर्वी जळगाव ते नागपूर शरद पवार साहेबांनी पायी दिंडी काढली होती. त्या इतिहासाची पुर्नरावृत्ती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो असेही कौतुक तटकरे यांनी केले.