मुंबई-गोवा महामार्गासाठी शिवसेनेचे धरणे आंदोलन
नागपूर : मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पाय-यांवर धरणे आंदोलन केले. महाडचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात आ.राजन साळवी, आ.सुनिल शिंदे ,आ.तृप्ती सावंत, प्रकाश सुर्वे आदींनी सहभाग घेतला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील अपघातात मृत पावलेल्या व गंभीर जखमी झालेल्या व कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या अपघाग्रस्तांना नुकसान भरपाई देऊन, राष्ट्रीय महागार्गाचे काम अर्धवट ठेवणा-या सुप्रीम पनवेल इंदापूर टोल्वेज प्रा.लि.या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आ. भरतशेठ गोगावले यांनी केली. विधानभवनाच्या पाय-यावर करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेनेच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.
सुप्रीम पवनेल इंदापूर टोल्वेज प्रा.लि.या कंपनीला जानेवारी २०११ रोजी या महामार्गाचे काम देण्यात येवून, जून २०१६ रोजी पूर्ण करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र अर्धवट काम राहिल्याने आतापर्यंत २ हजार ८६३ अपघात होवून ६१५ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे तर; २ हजार १४६ गंभीर जखमी झाल्या आहेत अशी माहिती आ. गोगावले यांनी दिली.