शिवरायांच्या जयंतीवरून विधानसभेत गदारोळ !
नागपूर : छ. शिवाजी महाराजांची जयंती राज्यात दोन वेळा साजरी करण्यात येते.हि जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली.
छ. शिवाजी महाराजांचा जन्म ८ एप्रिल 1630 आहे, याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले. यावर सरकारने एक संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी अशी मागणी सभागृहाला अवगत करण्याच्या मुद्याद्वारे केली. यावर विरोधकांनी गोंधळ घातला, महाराजांच्या जयंती बाबत विसंगत बोलण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडून हळवणकर यांचे म्हणणे रेकॉर्ड वरून काढण्याची जोरदार मागणी केली. मात्र ही माहिती सदस्याने माहितीसाठी दिली आहे, यामुळे यामध्ये काहीही असंसदीय नसल्याचे सांगून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांची मागणी धुडकावून लावली. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी यामध्ये वाद निर्माण करता कामा नये, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. यावर वावगे बोलणा-याला राज्यात नीट जगता येणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी, पण राज्यात अनेक मोठे प्रश्न असताना उगाच वाद वाढवू नये अशी भूमिका घेतल्याने सभागृह शांत झाले.