अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत जाहीर करा
नागपूर : हिवाळी अधिवेशन संपण्याअगोदर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
राज्यातील विदर्भ,मराठवाडा,खान्देश येथील तब्बल ४० लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बोंडअळीमुळे बरबाद झाले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई विमा कंपन्या काही देणार नाही. त्यामुळे अधिवेशन संपण्याअगोदर नुकसानभरपाई देण्याचे अध्यक्षमहोदय तुम्ही मुख्यमंत्र्यांचा दाखला देत जाहीर केले आहे त्या घोषणेशी पक्के आहात ना असा सवाल अजित पवार यांनी केला.
राज्याच्या तीन विभागामार्फत पंचनामे सुरु आहेत. कर्जमाफीचे पैसे बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी जशा बॅंका शनिवार-रविवारी सुरु ठेवल्यात त्याचप्रकारे अधिकाऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी,बळीराजासाठी संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत शनिवार-रविवार बघू नका त्यांना रात्रंदिवस काम करायला सांगा अशी सूचना अजित पवार यांनी सरकारला केली.शेतकऱ्याला कापसाला नुकसानभरपाईपोटी एकरी २५ हजार रुपये आणि तुडतुडयाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये दयावी आणि सर्व पंचनामे होईपर्यंत सरकारने स्वत:कडील पैसे वापरुन शेतकऱ्यांना दिलासा दयायला हवा अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.