विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करा

विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करा

मुंबई : जोगेश्‍वरी पुर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या, सुचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री तसेच जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार बचतगटाचे किचन होते का? याचीही तपासणी करण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. १३ डिसेंबर २०१७ रोजी जोगेश्‍वरी पुर्व, शामनगर येथील बालविकास विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत देण्यात आलेली खिचडी खाल्याने सुमारे ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने कोकण तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागपुर येथे अधिवेशन सुरू असतानाही राज्यमंत्री वायकर सातत्याने स्थानिक नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, सदानंद परब, रुग्णालयातील डॉक्टर तसेच शिवसैनिकांच्या संपर्कात होते. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना चांगले उपचार देण्याच्या सुचनाही त्यांनी या सर्वांना दिल्या होत्या. सगळ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येत नाही तोपर्यंत ते सतत या सर्वांच्या संपर्कात होते.

अधिवेशनाला शनिवार व रविवार सुट्टी असल्याने शुक्रवारी उशीराने मुंबईत आल्यावर शनिवार सकाळी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तातडीने बालविकास विद्यामंदिर शाळेला भेट दिली. यावेळी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी उपस्थित शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी, पोलिस, महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, यांच्याशी संवाद साधला.

या घटनेनंतर दोन मुलांच्या पोटांतील अन्नाचे नमुने तसेच सातही डब्यातील खिचडीची नमुने घेण्यात आले आहेत. या अन्नामध्ये विष होते का? याची तपासणी करण्यासाठी शासनाच्या कालिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागानेही नमुने आपल्या प्रयोगशाळेत नेले आहेत. गोडाऊनमधील धान्याचे नमुनेही घेण्यात आल्याची माहिती, मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पांडुरंग पाटील यांनी राज्यमंत्री यांना दिली. या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तर या खिचडीचे नमुने महापालिकेच्या प्रयोगशाळेतही तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती, उपशिक्षणाधिकारी यांनी दिली. या घटनेनंतर या शाळेतील विद्यार्थ्यांना  ‘शालेय पोषण आहार’ नको अशी भुमिका पालकांनी घेतल्याची माहिती, शाळा व्यवस्थापनाने वायकर यांना दिली.

यानंतर ज्या बचत गटाकडून ही खिचडी आणण्यात आली होती, त्यांचे किचन महापालिकेच्या निमयानुसार होत का? याची तपासणी करण्यात यावी, अशी सुचना वायकर यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे अन्न देण्यात आले, त्यात आवश्यक तेवढ्या कॅलरीज होत्या का? याची ही तपासणी करण्यात यावी, अशी सुचनाही त्यांनी पोलिस विभागाला केली.

या घटनेच्यावेळी शाळातील व्यवस्थापन, शिक्षक, डॉक्टर, पोलिस विभाग, शिवसैनिक यांनी समयसुचकता दाखवत जे काम केले त्या सर्वांचे सुधार समिती अध्यक्ष तसेच नगरसेवक बाळा नर यांनी आभार मानले. यावेळी महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकरही उपस्थित होत्या.

Previous articleएसीबीची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना क्लिन चीट
Next articleकोल्हापूरच्या विद्यार्थींनीची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here