विषबाधेवर १०२ आमदारांचे प्रश्न
नागपूर : विदर्भातील यवतमाळ, अकोला, नागपूर, अमरावती जिल्ह्यात कापूस पिकावर फवारणीसाठी वापरल्या जाणा-या “प्रोफेसर सुपर” या कीटकनाशक फवारणीमुळे सुमारे ३८ शेतक-यांचा विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूचा तारांकित प्रश्न एकूण १०२ आमदारांनी उपस्थित केला होता.विशेष म्हणजे यामध्ये कारागृहात असणारे छगन भुजबळ यांच्यासह मुंबई पुणे या शहरी भागातील आमदारांचा समावेश आहे.
यंदा नागपूर मध्ये सुरू असणारे हिवाळी अधिवेशन शेतक-यांच्या प्रश्नावरच गाजत आहे. कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असतानाच , विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतक-यांचा तारांकित प्रश्न सुमारे १०२ आमदारांनी उपस्थित केला आहे.काल शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न क्रमांक ४३ चर्चेला आला नसला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी एकाच विषयावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे सदस्य छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार , पुणे मुंबई येथिल शिवसेना आणि भाजपचे सदस्य यांनी हा प्रश्न मांडला होता.
विदर्भातील नमूद जिल्हयांच्या परिक्षेत्रात ३८ शेतकरी आणि मजूरांचा झालेला मृत्यू हा प्रोफेसर सुपर या किटकनाशकाच्या फवारणीच्या विषबाधेमुळे झाल्याचे आढळून आलेले नसून, हे मृत्यू वेगवेगळ्या किटकनाशकांची फवारणी करताना झाल्याचे स्पष्ट करतानाच, मृत शेतमजूरांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उत्तर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.