देशभरातील लाखो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला
विखे पाटील
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्र खा. राहुल गांधी यांनी स्विकारल्यामुळे देशभरातील लाखो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल आणि पक्षाची वाटचाल नव्या उमेदीने पुढे जाईल असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्र स्विकारल्यानंतर विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवी दिल्ली येथील १० जनपथ येथे खा.राहुल गांधी यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्ष पदाची सुत्र खा.राहुल गांधी यांनी स्विकारल्याचा मनस्वी आनंद देशभरातील लाखो कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झाला आहे. पक्षाच्या दृष्टीने हा अतिशय आनंददायी क्षण असल्याचे नमुद करुन, विखे पाटील म्हणाले की, खा. राहुल गांधी एक खंबीर नेते आहेत. मागील अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मजबुतीदेण्यासाठी ते देशभर फिरतआहेत.शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला,युवक, दलित, आदिवासी, अल्पसंख्यक आदी समाजघटकांबाबत ते कमालीचे संवेदनशील असून, याच घटकांना केंद्रीभूत ठेवून ते काम करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील उपेक्षीत,मागास व वंचित घटकांचा आवाज अधिक बुलंद होईल.
खा. राहुल गांधी यांच्या कार्यकाळात पक्ष संघटना अधिक सक्षमपणे बळकट होईल, पक्षाची वाटचाल नव्या उमेदीने पुढे जाईल. काँग्रेस अध्यक्ष म्हणून खा. राहुल गांधी यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर नवा आत्मविश्वास पक्षसंघटनेत निर्माण झाला आहे. देशातील तरूणाईमध्ये उत्साह संचारला असून, कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळाल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.