राज्यात एक कोटीचा गुटखा जप्त

राज्यात एक कोटीचा गुटखा जप्त

नागपूर : राज्यात छूप्या मार्गाने विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

यासंदर्भात डॉ. संतोष टारफे, निर्मला गावीत, कुणाल पाटील, अमिन पटेल, डी. पी. सावंत, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य सदस्यांनी मुंबईसह राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बापट यांनी म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात कारवाई केली जाते.

सी.बी.कंट्रोल आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली असून,३ ऑक्टोबर रोजी २८ लाख ८७ हजार १५० रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर ४ ऑक्टोबर व १० ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत अनुक्रमे १२ लाख ६५ हजार आणि ९ लाख ३१ हजार ४६० रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या लातूर कार्यालयाने २७ ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत ४२ लाख १२ हजारांचा प्रतिबंधीत अन्नसाठा जप्त केला आहे. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे १० लाख रुपये किंमतीचा परराज्यातून विक्रीस येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे.अशा प्रकारे सुमारे एक कोटी दोन लाख ९६ हजार २१० रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Previous articleपाणीपुरवठा विभागात चिरीमिरी शिवाय टेंडर मंजूरच होत नाही
Next articleहल्दीराम उत्पादित अन्न नमुन्यांची पुन्हा तपासणी होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here