रायगड जिल्ह्याच्या २४३ कोटीच्या पर्यटन आराखड्याला लवकरच मंजूरी
नागूपर : रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी २४३ कोटींच्या विकास आराखड्याला लवकरच मंजूरी देणार असल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सदस्य जयंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना विधानपरिषदेत सांगितले.
रावल पुढे म्हणाले रायगड जिल्ह्यातील ५९ गावांचा पर्यटन विकासाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने २४३ कोटींची विविध कामे केली जाणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला ५ लाख रु.वितरित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पर्यटन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार एकूण १२ जिल्ह्यांचे आराखडे अंतीम मंजूरीसाठी सरकारकडे आहेत. रायगड किल्ल्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी रायगड किल्ला प्राधिकरण स्थापित करण्यात येणार असल्याचे रावल यांनी शेवटी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, सदस्य सुनिल तटकरे, प्रविण दरेकर यांनी भाग घेतला.