राज्याला कर्जबाजारी केले तरीही शेतकरी मात्र कर्जमुक्त नाही
धनंजय मुंडे
नागपूर : गेल्या तीन वर्षात एक लाख ७० हजार कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या करुन ऐतिहासिक कर्जमाफीसारख्याच ऐतिहासिक पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. राज्याचा कर्जाचा बोजा चार लाख ४४ हजार रु. करून राज्याला कर्जबाजारी केले. शेतकऱ्याला मात्र कर्जमुक्त करता आले नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पुरवणी मागण्यांवर बोलताना त्यांनी सरकारच्या आर्थिक बेदिलीची चिरफाड केली. शपथविधीवर भाजपने शपथविधीला १०० कोटी रुपये खर्च केले. तेव्हापासून भाजपने स्वतःच्या जाहीरातीसाठी जनतेच्या कर रुपातला किती पैसा खर्च केला. याचा तपशील राज्याला हवा आहे. मागील अधिवेशनात २० हजार कोटी रुपयांची तरतूद करूनही कर्जमाफीच्या नावावर ज्या पुरवणी मागण्या मान्य केल्या, ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात गेले का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.मागील वर्षी सोयाबिनच्या विक्रीबद्दल शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला मात्र त्याची भरपाई देण्यासाठी सरकारला एक वर्ष लागले. सरकारची हीच गतिमानता आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.