ओखी वादळग्रस्तांना नियमानुसार नुकसान भरपाई देणार           

ओखी वादळग्रस्तांना नियमानुसार नुकसान भरपाई देणार       

नागपूर : राज्यातील ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून नियमानुसार त्यांना मदत देण्यात येईल, असे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत सदस्य जयंत पाटील उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील विशेषतः रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात ओखी वादळामुळे नुकसान झालेले आहे. रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झालेल्या कडधान्य व भाजीपाला पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओखी चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जाकीमिऱ्या येथील ५२ मच्छिमारांची जाळी वाहून गेल्याने अंदाजे ४३.२६ लाख रुपयांचे नुकसान झालेले असून यासंबंधी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांचेमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड व सटाणा या तालुक्यात ओखी चक्रीवादळामुळे प्राथमिक अहवालानुसार सुमारे १ हजार ३६  हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष व इतर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच ओखी वादळामुळे राज्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून आपदग्रस्तांना नियमानुसार मदत देणार असल्याचे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

Previous articleराज्याला कर्जबाजारी केले तरीही शेतकरी मात्र कर्जमुक्त नाही
Next articleअनुदानित शाळांच्या मान्यता यादीत घोटाळा