अनुदानित शाळांच्या मान्यता यादीत घोटाळा
धनंजय मुंडे यांचा शिक्षण खात्यावर हल्लाबोल
नागपूर : शालेय शिक्षण विभागाने १ जुलै २०१६ रोजी कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व त्यानंतर अनुदानासाठी पात्र केलेल्या १८८ शाळांच्या यादीतही घोटाळा असून मुल्यांकनच न झालेल्या प्रत्यक्षात बंद असलेल्या शाळांना मान्यता देण्यात आल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आज पुरवणी मागण्यांदरम्यान शिक्षण विभागाच्या चर्चेदरम्यान केली.
धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील डाबली, धांदरने, बाभळी, दभाषी या प्राथमिक व माध्यमिक शाळा शासनाचे बनावट स्थलांतर परवानगी पत्र सादर करुन सुरु करण्यात आल्या. या शाळा प्रत्यक्षात बंद असताना व शाळांचे मुल्यांकन न झाल्याबाबत शिक्षण अधिकारी धुळे, विभागीय उपसंचालक नाशिक यांनी लेखी कळवूनही त्यांना मान्यता दिल्याचे मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या शाळा अनुदान मान्यतेचे एक रॅकेट असून याबाबत तीन वेळा पत्रव्यवहार करुनही चौकशी होत नाही. म्हणून या संपूर्ण मान्यताप्रक्रियेची अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत समिती गठित करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.