नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका उघड
सुनिल तटकरे
नागपूर : शिवसेना जैतापूर प्रकल्पाबाबत आणि समृध्दी प्रकल्पाबाबत जशी दुटप्पी भूमिका घेत आहे तशीच दुटप्पी भूमिका नाणार प्रकल्पाबाबत घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार सुनिल तटकरे यांनी केला.
रत्नागिरी जिल्हयातील राजापूर तालुक्यात नाणार येथे पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तरीही पोलिस बंदोबस्तामध्ये जबरदस्तीने जमिनीची मोजणी होत आहे. ती तात्काळ बंद करुन कोकणाला उध्वस्त करणारा हा प्रकल्प रद्द करावा अशी लक्षवेधी काँग्रेस आमदार हुस्नबानु खलिफे यांनी मांडली. या लक्षवेधी दरम्यान चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सहभाग घेवून शिवसेनेचे दुटप्पी धोरण उघडे पाडले. सरकारचे उद्योगमंत्री सुभाष देसाई स्थानिकांचा विरोध होत असेल तर प्रकल्प होवू देणार नाही असे म्हणत आहेत मात्र प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेत नाहीत अशी टिका तटकरे यांनी केली.ग्रामस्थांचा विरोध असताना सेनेचे पर्यावरणमंत्री आणि दोन आमदारांनी पत्र लिहून प्रदूषण होणार असल्याचे सांगितले आहे. तरीही उदयोगमंत्री प्रदुषण होणार नाही असा दावा करत आहेत असा आरोप आमदार किरण पावसकर, आमदार विद्या चव्हाण यांनी केला.