येळकोळ ….येळकोट..जयमल्हार !
नागपूर : धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी धनगराचा पेहराव करून अनोखे आंदोलन केले.आरक्षणाचा विसर पडलेल्या सरकारला जागृत करण्यासाठी धनगर समाजाचे प्रतिक म्हणून हे आंदोलन केल्याचे पाटील यांनी सांगितले.
सभागृहाचे कामकाज सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे धनगराच्या पेहराव्यात विधानभवन परिसरात आगमन झाले. धोतर, कुर्ता, पिवळा फेटा, हातात काठी, आणि कपाळाला भंडारा लावलेले आ. जयंत पाटील यांच्या सोबत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय पाटील यांनी ” धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे” येळकोट.. येळकोट जय मल्हार…आरक्षण नाकारणा-या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देवून विधानभवन परिसर दणाणून सोडला.
धनगराच्या पेहरावामध्येच जयंत पाटील यांची घोषण देत सभागृहात प्रवेश केला. तेव्हा हातातील काठी बाहेर घेवून जावा अशी सूचना अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली. तर जयंत पाटील यांचा पाय मुरगळला असल्याने त्यांनी काठीचा आधार घेतला असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. सभागृहात जयंत पाटील हे चालतच आले आहेत.त्यांचा पाय मुरगळला वगैरे काही नाही काठी बाहेर घेवून जा अशी विनंती अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पुन्हा केल्यानंतर जयंत पाटील हे उभे राहिले आणि रात्रीच माझा पाय मुरगळला त्यामुळे काठी आणल्याचे सांगून, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. त्याचा या सरकारला विसर पडला आहे. सरकारला जागृत करण्यासाठी हि भूमिका घेवून आल्याचे त्यांनी स्पष्ट करीत, सरकारने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास समाज हातात काठी घेतल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दिला.