वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांच्‍या प्रश्‍नांवर पंधरा दिवसात  निर्णय

वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांच्‍या प्रश्‍नांवर पंधरा दिवसात  निर्णय

वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍याचे निर्देश महापालिकांना देणार

रेल्‍वे हद्दीतील विक्रेत्‍यांनाही संरक्षण मिळणार

नागपूर : मुंबई, ठाणेसह एमएमआर क्षेत्रातील आणि राज्‍यातील सर्व महापालिका हद्दील वृत्तपत्र विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍यात यावे असे निर्देश ता‍तडीने सर्व महापालिकांना देण्‍यात येतील. तर रेल्‍वे हद्दीतील विकेत्‍यांना संरक्षण देण्‍याबाबत रेल्‍वेच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांना कळ‍वण्‍यात येईल. तसेच या विक्रेत्‍यांचे प्रश्‍नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्‍यासाठी लोकप्रतिनीधी, विक्रेत्‍या संघटना आणि संबंधित पालिका आयुक्‍त व रेल्‍वे व शासनाच्‍या अधिका-यांची संयुक्‍त बैठक येत्‍या पंधरा दिवसात घेण्‍यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्‍य मंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत केली.

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्‍या माध्‍यमातून वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांचे प्रश्‍न मांडले. यावेळी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, मुंबईसह ठाणे आणि एमएमआर क्षेत्रात १५ हजार वृत्तपत्र विक्रेते असून सुमारे ३ हजार स्‍टॉल आहेत. हे विक्रेते अत्‍यंत अल्‍प मानधनावर काम करीत आहेत. वृत्‍तपत्र आणि बातम्‍या वाचकापर्यंत पोहचवणारा हा घटक महत्‍वाचा आहेच. शिवाय शासनाच्‍या नोटीस, गॅजेटही जनतेपर्यंत पोहचवणारा हा महत्‍वाचा घटक आहे. या व्‍यवसायावर सुमारे दिड लाख कुटुंबांचा उदर्निवाह अवलंबून आहे. पण दुदैवाने त्‍यांच्‍यावर महापालिका आणि रेल्‍वेकडून वारंवार कारवाई करून त्‍यांचे नुकसान केले जाते. हा व्‍यवसाय काही पैशांच्‍या मानधनावर केला जात असताना त्‍यांना कोणत्‍याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही. त्‍यामुळे फेरिवाल्‍यांवर कारवाई करताना अशा विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍यात यावे व त्‍याबाबतचे आदेश महापालिकांना व रेल्‍वेला देण्‍यात यावेत. तसेच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍याकडे संघटनांच्‍या १९ जुलैला झालेल्‍या बैठकीत अशा वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांसाठी कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. त्‍या मंडळाची स्‍थापना तातडीने करण्‍यात यावी, अशा मागण्‍या त्‍यांनी केल्‍या. तर भाजपा आमदार संजय केळकर यांनीही ठाणे आणि परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्‍यांच्‍या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. तसेच आमदार मंगल प्रभात लोढा यांनीही या चर्चेत भाग घेत या मागण्‍यांना बळ देत भाजपा आमदारांनी अत्‍यंत आक्रमकपणे यांच्‍या मागण्‍या मांडल्‍या.

या चर्चेला उत्‍तर देताना राज्‍य मंत्री रणजित पाटील यांनी सांगितले की, २४ आक्‍टोबर ला आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या सह वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्‍यावेळी त्‍यांच्‍या पत्रावर मुख्‍यमंत्र्यांनी याबाबत मुंबई महापालिकांना निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार ठाण्‍यासह राज्‍यातील सर्व महापालिकांना वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांना संरक्षण देण्‍याबाबत निर्देश देण्‍यात येतील. तसेच फेरिवाला धोरण निश्चित करण्‍यात येत असून त्‍यामध्‍ये न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार फेरिवाल्‍या कमिटी गठीत करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येत असून ती येत्‍या दोन महिन्‍यात पुर्ण करण्‍यात येईल. या धोरणामध्‍ये वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांचा झोन करून संरक्षण देण्‍याबाबत शासन सरकारत्‍मक आहे. फेरिवाल्‍यांच्‍या धोरणात वृत्‍तपत्र विक्रेत्‍यांसाठी स्वतंत्र कलम टाकून त्‍यांना संरक्षीत करण्‍यात येईल. तसेच त्‍यांच्‍या प्रश्‍नांबाबत चर्चा करून तोडगा काढता यावा म्‍हणून येत्‍या पंधरा दिवसात रेल्‍वेसह संयुक्‍त बैठक शासनाकडून घेण्‍यात येईल, असेही राज्‍यमंत्र्यांनी जाहीर केले.

Previous articleकोकणातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करा
Next articleऊसतोड कामगार महामंडळावरून धनंजय मुंडे प्रचंड आक्रमक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here