माहिती अधिकाराचा गैरवापर होत असल्यास कारवाई करणार
नागपूर : माहिती अधिकार कायद्याचा कोणी गैरवापर करीत असल्याबाबत पुरावे असल्यास त्याबाबत पोलीस ठाणे किंवा संबंधीत प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार करावी, त्यावर कार्यवाही केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
ठाणे शहरात अनेक जण माहिती अधिकाराचा गैरवापर करीत असल्याबाबत सदस्य प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, ठाणे महापालिकेकडे माहिती अधिकारातून दरवर्षी साधारण १५ हजार ६०० अर्ज प्राप्त होतात. ठराविक व्यक्ती वारंवार अर्ज करीत असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत असले तरी माहिती अधिकारात अका व्यक्तिने किती अर्ज करावेत यावर बंधन नाही. माहिती अधिकार अधिनियमातील नियम ८ व ९ मध्ये समाविष्ठ बाबींसंदर्भात माहिती देण्याचे बंधन नाही. उर्वरीत बाबींसंदर्भात माहिती उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. काही प्रकरणांमध्ये तक्रार करुन कालांतराने ती मागे घेत असल्याचेही दिसून आले आहे. अशा प्रकरणातं चौकशी बंद न करता ती पूर्ण करण्याचा पर्याय महापालिकेसमोर खुला आहे. शहर विकास विभागाच्या मंजुऱ्या व अन्य ज्या बाबींसाठी माहिती अधिकार अर्ज प्राप्त होतात अशा बाबींची माहिती वेबसाईटवर टाकल्यास अर्जाची संख्या कमी होऊ शकते. याबाबत महापालिकेस कळविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.