मी दुस-या कोणत्याही पक्षात जाणार नाही : खडसे
मुंबई : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपल्याच पक्षाला खिंडीत गाठणारे माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आपण दुस-या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. तर;राष्ट्रवादीची ही जुनीच खेळी असून, एकनाथ खडसे हे भाजप सोडणार नाही असे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.
भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडसे यांचे मंत्रिमंडळात परत येणे जवळ जवळ अशक्य आहे.
जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. यावेळी अनेक नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्याबाबत अनेक जण पक्ष नेतृत्वाशी चर्चा करत आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसेच राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो असे म्हणत एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत संकेत मलिक यांनी दिल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आज राजकिय वर्तुळात सुरू आहे. मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता , मी दुस-या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून या चर्चेला पूर्ण विराम दिला. राष्ट्रवादीची ही जुनीच खेळी असून, एकनाथ खडसे भाजप सोडणार नसल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.