मोपलवार चौकशी अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा !
पुणे : जॉनी जोसेफ यांच्या चौकशी समितीने क्लीन चिट दिलेले राज्य रस्ते महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांचा चौकशी अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्य रस्ते महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारने फेरनियुक्त केलेले राधेश्याम मोपलवार यांचा चौकशी अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे. सदर माहिती अधिकार कायद्यानुसार प्रसिद्ध करणे शासनावर बंधनकारक असल्याचेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करीत असून, त्याची जबाबदारी मोपलवार यांच्याकडे होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोपलवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते.या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात केली होती. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीमध्ये दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने क्लीन चिट दिल्यानंतर राधेश्याम मोपलवार यांना राज्य रस्ते महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य शासनाने फेरनियुक्त केले आहे.