स्थानिक भूमीपूत्रांच्या पाठीशी ठाम उभा राहणार

 स्थानिक भूमीपूत्रांच्या पाठीशी ठाम उभा राहणार

शरद पवार

 उरण : कुठलाही प्रकल्प म्हटला की,भूमीपूत्रांच्या,शेतकऱ्यांच्या जमीनी त्यामध्ये जातात. मात्र त्यांना त्यांच्या जमिनींना योग्य मोबदला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यागाची भूमिका घेणाऱ्या राज्यातील माझ्या स्थानिकांना मी  वाऱ्यावर,मोकळं सोडणार नाही तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

रायगड जिल्हयासाठी त्याग करणाऱ्या कुटुंबातील तरुणपिढीला आम्ही उध्वस्त होवू देणार नाही. महाराष्ट्राच्या विकासात त्यांची त्यागाची भूमिका असून येत्या आठ दिवसामध्ये रायगड जिल्हयाला भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेवून मार्ग काढणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचा तालुका उरण आहे.याशिवाय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असलेला उरण तालुका आहे. आज उरण आणि रायगड जिल्हयामध्ये नागरीकरण होत असताना नागरीकरणाचा लाभ घेण्यासाठी बाहेरचे लोक मोठयाप्रमाणात येत आहेत. परंतु त्यामध्ये स्थानिकांना न्याय मिळताना दिसत नाही. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन मिळायला हवी यासाठीचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला होता. जेएनपीटीबाबत गोंधळ सुरु असताना न्हावाशेवा बंदर झाले पाहिजे यासाठी विधानसभेत ठराव केला होता. त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाईंना आमचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये जेएनपीटीसंदर्भात भेटले होते असेही  पवार म्हणाले.

रायगड जिल्हयाच्या विकासाच्या प्रकल्पाला हातभार लावण्यासाठी प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि गणेश नाईक यांच्या माध्यमातून सुरु आहे. विकास झाला परंतु स्थानिकच त्यामुळे अडचणीत आहेत असे चित्र आज दिसत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर माझे सहकारी प्रयत्न करतात,त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न करतात असेही पवार म्हणाले.जेएनपीटी प्रकल्प उभा राहिला,त्यामुळे विकासही झाला परंतु त्यामध्ये इथला शेतकरी,मूळमालक मात्र उध्वस्त होत आहे.भविष्यात त्यांची पिढीही उध्वस्त होईल.त्यामुळे यामध्ये मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचेही शरद पवार म्हणाले. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना रस्त्यातील खड्डयावरुन चिमटेही काढले. त्यांनी खड्डे दाखवा बक्षिस मिळवा या जाहीर केलेल्या घोषणेची खिल्ली उडवताना रायगडमधील त्यांना खड्डे दाखवण्याची विनंती आयोजकांना केली. म्हणजे त्यांची जाहीर केलेली योजना त्यांना किती स्वस्त झोपू देईल हेही कळेल असेही पवार म्हणाले.

 पवार यांच्या भाषणाअगोदर काही स्थानिक कामगारांनी त्यांना निवेदनेही दिली. त्यांच्या निवेदनाचा धागा पकडत त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या,कामगारांच्या,प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये रायगड जिल्हयाचे पक्षाचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या कामाची स्तुती करत त्यांच्या चांगल्या कामाची शाबासकीही दिली.

Previous articleमहानगरपालिकेला इमारतींचे ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Next articleउच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here