शरद पवार हे भावी राष्ट्रपती !
सुशीलकुमार शिंदे यांचे उदगार
पुणे : प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शकला नसला तरी शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार होत असून, शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत, असे उदगार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमामध्ये काढले.
माजी केंद्रियमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा केल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांनी लगेच नाही नाही म्हणत नकारार्थी हात दखवला. मात्र, पवारांचा नकार हाच त्यांचा होकार आहे असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. मीच पवार यांच्या करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याचे शिंदे यांनी सांगताच सभागृहात पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जीवनावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथ आणि संकेतस्थळाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
प्रतिभाताई यांनी अनेक महत्वाच्या पदांवर कामे केली मात्र मुख्यमंत्री पदावर काम करायचे राहून गेले. त्यांच्यापासून हे पद हिरावून घेण्याचे काम मात्र मी केले, असे पवार मिश्किलपणे म्हणाले. शेवटपर्यंत लोकांशी संवाद साधत राहणार असून, हा माझा मार्ग नाही असे सांगत राष्ट्रपती पदाच्या चर्चेला पवार यांनी स्वतःच पूर्ण विराम दिला.