जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयांवर भुजबळ समर्थकांची उद्या निदर्शने
नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी उद्या मंगळवारी देशभरात एकाच वेळी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय व तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता लोकशाही मार्गाने निदर्शने करण्यात येणार आहे. यावेळी काळे पोशाख परिधान करून भुजबळांवरील अन्यायाबाबत तीव्र निषेध करण्यात येणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून चौकशीच्या नावाखाली कारागृहात डांबून ठेवलेले आहे. त्यांच्यावर न्यायालयामध्ये अद्यापही कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाही. मात्र गेल्या २२ महिन्यांपासून शासनाच्या चौकशी यंत्रणेने केवळ चौकशीच्या नावाखाली त्यांना कारागृहात डांबून ठेवले आहे. वास्तविक भुजबळांकडून न्यायालयीन चौकशीला संपूर्णपणे सहकार्य केले जात असतांना सरकारकडून मात्र सूडबुद्धीने कारवाई सुरु आहे असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांकडून करण्यात येत आहे.ईडी व सीबीआय ने कारवाई केलेले अनेक राजकीय नेते, उद्योजक,व्यापारी यांना जामीन मिळाले. सुप्रीम कोर्टाने मनी लॉन्ड्रींग प्रकरणातील कलम ४५ हे घटनाबाह्य असल्याचा नुकताच निर्वाळा दिला आहे. या कलमामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. हा कलम रद्द झाल्यामुळे आरोपीला आपला जामीन मागण्याचा पूर्ण अधिकार असून आरोपीला कोर्ट जामीन नाकारू शकत नाही असे स्पष्ट न्यायनिवाडे देऊनही भुजबळांना केवळ आकसापोटी कारागृहात डांबून ठेवण्यात आल्यामुळे भुजबळ समर्थकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे भुजबळ समर्थकांकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर लोकशाही मार्गाने निषेध करत शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यात येणार आहे.यासाठी भुजबळ समन्वय समितीकडून नाशिक जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना भुजबळ समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आपला पाठींबा दर्शविला आहे.