एकनाथ खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागतच
अशोक चव्हाण
मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात येण्याचे आवाहन केल्यानंतर आता एकनाथ खडसे यांना पक्षात येण्याचे निमंत्रण काॅग्रेसने दिले आहे. खडसे हे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काॅग्रेसने पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते .त्यानंतर जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर हजेरी लावत माझ्या मनात जे आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितले असल्याचे स्पष्ट करून एकच खळबळ उडवून दिली होती. आता नाराज खडसे यांना काॅग्रेसने पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. खडसे काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. खडसे हे भाजपात नाराज असतील आणि त्यांची काॅग्रेस पक्षात येण्याची इच्छा असेल तर आम्हालाही विचार करता येईल असे चव्हाण यांनी म्हटल्याने राजकीत वर्तुळात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. चव्हाण यांनी खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले आमंत्रण देत ,नवीन वर्षात भाजपमधील नाराजांचे स्वागतच आहे असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.