भिमानुयायांवर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करावी
मुंबई : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला शौर्यदिनाच्या द्विशतक महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठया प्रमाणावर भिमानुयायी सहकुटुंब जात असताना . या परिसरातील सवर्ण मराठा समाजाने भीम अनुयायांवर केलेला भ्याड हल्ला हा निंदनीय आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी . निरपराध भीम अनुयायांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करावी. अशी मागणी करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. दलित मराठा संघर्ष पेटविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे . हे षडयंत्र रोखण्यासाठी मराठा आणि दलितांनीही संयम ठेऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
भीमा कोरेगाव येथील सणसवाडी व परिसरात भीम अनुयायांवर हल्ला होत असल्याचे कळताच केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तातडीने पुणे जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आंबेडकरी अनुयायांच्या संरक्षणासाठी ज्यादा पोलिसांची कुमक पाठविण्याचे निर्देश दिले.त्यानुसार एस आर पी पाठवीत असल्याची त्यांनी माहिती दिली.तसेच आठवले यांनी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्वरित संपर्क साधून या प्रकरणाकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.वढू गाव येथे शूरवीर गोविंद गायकवाड यांच्या समाधीची काही अज्ञातांनी तोडफोड केली. त्याबद्दल येथे झालेला वाद मिटला होति मात्र आता तो वाद वाढवून प्रकरण वाढविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला आहे .हा प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणातून उद्भवलेला वाद न वाढविता शांतता बाळगा . यापूर्वी कधीच येथे दलित मराठा संघर्ष झाला नाही. या पुढेही होऊ नये म्हणून शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.
वाढू गावात ज्या लोकांवर अट्रोसिटी दाखल झाली आहे ती रद्द करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला त्यावेळी भीम अनुयायांवर हल्ला करण्यात आला . यातुन वाढुगाव सणसवाडी आदी ठिकाणी भिमानुयायांवर हल्ला झाला . याप्रकारणाबाबत आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.भीमा कोरेगाव येथे भिमानुयायांवर झालेल्या हल्ल्याची वार्ता कळताच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुरध्वनी करून या हल्ल्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली . त्यावर त्वरित या प्रकरणी लक्ष घालून या हल्ल्याची कसून चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवलेंना दिले.हा हल्ला कट रचून झाला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी. हल्लेखोरांवर अट्रोसिटी नुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी करतानाच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मात्र वेळेवर पोलीस मदत पोहोचली नाही यामुळे जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आठवलेंनी केली आहे.