भुजबळ समर्थकांकडून राज्यभरात जोरदार निदर्शने
नाशिक : ‘सामान्यांसाठी जगणे ज्यांचं,सामान्यांचाच ध्यास, त्या साहेबांसाठी लढण आमचे, त्यांच्यासाठीच श्वास’अशा आशयाची पोस्टर झळकावत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईबाबत आज राज्यभरात भुजबळ समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन देण्यात आली.
भुजबळांवरील अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व समर्थकांनी काळा पोशाख तसेच डोक्यावर ‘मी भुजबळ’ या नावाच्या गांधी टोप्या परिधान करत ‘‘भुजबळ साहेब मांगे…जस्टीस, समिरभाऊ मांगे…जस्टीस, भुजबळ साहेब संघर्ष करो…हम तुम्हारे साथ है, समीरभाऊ संघर्ष करो…हम तुम्हारे साथ है’’ अशा घोषणा दिल्या.
नाशिक येथे झालेल्या आंदोलनाला भुजबळ समर्थक आ.जयवंतराव जाधव, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते जी.जी.चव्हाण,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, आदी उपस्थित होते.
भुजबळ समर्थक समन्वय समिती कडून संबंधित जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक आणि कोट्यावधी शोषित-पिडीत व वंचितांचे आशास्थान असलेले छगन भुजबळ तसेच नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली चौकशी यंत्रणांनी गेल्या २२ महिन्यांपासून चौकशीच्या नावाखाली डांबून ठेवलेले आहे. बंदी करून जामीन न देणारा कायदा घटनाबाह्य आहे असा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच न्यायनिवाडा दिला आहे. तरीही त्यांना केवळ आकसापोटी कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. त्यांचा दोष अद्याप सिद्ध झालेला नाही तरीही केवळ खोट्या-नाट्या आरोपांमुळे देशातील बहुजनांच्या या नेत्याला कारागृहात डांबून ठेवणे हा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय असल्याची आम्हा सर्व समर्थकांची भावना असल्याचे म्हटले आहे.
‘‘खूप झालं,खूप सोसलं,तयारी आता सत्याग्रहाची, साहेबांवरील अन्यायाविरुद्ध, वेळ आली आता लढण्याची’, भावना सुडबुद्धीची,लाचार राजकारणाची आवाज उठवू आज सारे,साथ देऊ या योद्ध्याची’ , ‘सूडबुद्धीने वागणाऱ्या सरकारला, चला धरू या धारेवर, न्याय आता मिळालाच पाहिजे, नाहीतर आणू सरकार ताळ्यावर’, ‘साहेबांवरील अन्यायाविरुद्ध, मार्ग आमचा समतेचा, २ जानेवारीला तहसील कार्यालयावर,ऊमटणार आवाज सत्याग्रहाचा’, ‘अन्यायाविरुद्ध आवाज हा, सरकारविरुद्ध एल्गार हा, साहेबांच्या न्याय हक्कासाठी,समतेचा मार्ग हा’, ‘चला करुया तयारी,आपण आता आंदोलनाची, समतेचा मार्ग आपला, मागणी आमची न्यायाची’, ‘सामान्यांसाठी जगणं ज्यांचं, सामान्यांचाच ध्यास, त्या साहेबांसाठी लढण आमचं,त्यांच्यासाठीच श्वास’, ‘२ जानेवारी २०१८,दिवस हा आंदोलनाचा, साहेबांवरील अन्यायाविरुद्ध आवाज समतेने उठविण्याचा’’ अशा आशयाची पोस्टर झळकविण्यात आली.
भुजबळ साहेब मांगे…जस्टीस,समिरभाऊ मांगे…जस्टीस, येवला मांगे….जस्टीस, नांदगाव मांगे…जस्टीस,नाशिक मांगे…जस्टीस, ओबीसी मांगे…जस्टीस, एस.सी मांगे…जस्टीस, एस.टी मांगे…जस्टीस, विकास मांगे…जस्टीस,भुजबळ साहेब…झिंदाबाद, समीरभाऊ…झिंदाबाद, शरद पवार साहेब…झिंदाबाद,हम भी मांगे…जस्टीस, तुम भी मांगो…जस्टीस, हम सब मांगे…जस्टीस, भुजबळ साहेब संघर्ष करो…हम तुम्हारे साथ है,समीरभाऊ संघर्ष करो…हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.