प्रकाश आंबेडकर यांची उद्या महाराष्ट्र बंदची हाक
मुंबई : भीमा कोरेगाव येथे काल घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी उद्या बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेत पाळावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात उमटत असलेल्या हिंसक पडसादावर बोलताना सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी असे आवाहन आंबेडकर यांनी केले. बंदच्या काळात सर्वसामान्यांना त्रास होईल असे काही करु नका असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे.
येथिल घटनेत पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आणि पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचे अनुदान सरकारने बंद करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि स्थानिक नेते घुगे हे या घटनेचे सूत्रधार आहेत. त्यांनी हे सगळे कटकारस्थान रचले आहे, असा दावा त्यांनी केला.