शांतता, संयम तसेच कायदा-सुव्यवस्था पाळा

शांतता, संयम तसेच कायदा-सुव्यवस्था पाळा

राजकुमार बडोले यांचे सर्व जनतेला आवाहन

कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका

मुंबई : राज्यतील जनतेने शांतता, संयम तसेच कायदा-सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले. काल एक जानेवारी रोजी काही समाजविघातक शक्तींनी भिमाकोरेगाव येथे उद्रेक निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

बडोले म्हणाले की, भीमा- कोरेगाव येथील शौर्यगाथेला व विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने१ जानेवारी रोजी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी यावर्षी प्रचंड संख्येने अनुयायी आले होते. विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न शासनाने अलिकडेच निकाली काढल्यानंतर काही समाजविघातक शक्ती नाराज होत्या. त्यांनी अफवा पसरवून एक जानेवारी  रोजी उद्रेक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यानंतर तातडीने यासंदर्भात   मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीमार्फत घटनेची चौकशी करण्याचे घोषित केले. त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटूंबियांना दहा लाख रूपयांची तातडीची मदत तसेच यात मृत पावलेल्या युवकाच्या हत्येची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल, असे बडोले यांनी स्पष्ट केले आहे.

अशा घटनेचा सर्वच जातीधर्माच्या लोकांनी  निषेध केला तितका कमीच आहे. हि घटना कोणत्याही भारतीय व्यक्तीला लाजीरवाणी आहे. संविधानाने दिलेली लोकशाही आणि कायदा सुव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आपण सर्वांनी शांतता आणि संयम पाळावा, घटनेत बळी पडलेल्यांना मदतीचा हात द्यावा, तसेच  समाजविघातक शक्तींच्या अफवांपासून बचाव करावा असे आवाहनही बडोले यांनी केले.संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांची जपणूक आणि संवर्धन करण्याची परंपरा आपण सातत्याने पाळीत आलो आहोत. अशा वाईट घटना जेव्हा जेव्हा समाजात घडतात तेव्हा तेव्हा आपली जबाबदारी अधिक वाढते सर्व नागरिकांना शांततेचे, संयमाचे तसेच कायदा-सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन करीत आहे, कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका असे बडोले यांनी सांगितले.

 

Previous articleभीमा कोरेगाव प्रकरण हा पूर्वनियोजित कट
Next articleएसटी बसेस तुमच्याच आहेत, त्यांची तोडफोड करु नका…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here