१५ जानेवारीला पालिकेवर संताप मोर्चा
आ. नितेश राणे
मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील अग्निकांडानंतर महापलिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर हातोडा उचलला आहे. परंतु हा केवळ देखावा असून, अतिक्रमणे उद्ध्वस्त केल्यानंतर दुस-याच दिवशी सर्व हॉटेल्स पूर्ववत झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेची कारवाई म्हणजे निव्वळ फार्स असून मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी अवैध बांधकामांबाबत आवाज उठवणारे आरटीआय कार्यकर्ते, एनजीओंना धमकी दिली जात आहे. हा सर्व प्रकार संताप आणणारा असून याच्या निषेधार्थ येत्या १५ जानेवारी रोजी मुंबई महापालिकेवर संतप्त मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल वन अबव्ह व मोजोमध्ये २९ डिसेंबरला मध्यरात्री आग लागून १४ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर शहरातील बेकायदा हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर्सचा प्रश्न ऐरणीवर आला. मनपाने दुसºयाच दिवशी ३२५ अवैध बांधकामांवर कारवाईचा देखावा केला. याचाच अर्थ महापालिकेच्या अधिकाºयांनी एवढ्या मोठ्या संख्येने शहरात अवैध हॉटेल्स व त्यांची बांधकामे असल्याची माहिती होती. त्यामुळे या अधिकाºयांवर कामात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवून गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. तसेच अवैधरित्या हॉटेल्सला परवाने देण्यासाठी होणाºया आर्थिक व्यवहारांची व दोषी अधिकाºयांची एसीबीमार्फत चौकशी करण्याची मागणी राणे यांनी केली.
अग्निकांडानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात आली. परंतु मुख्य मालकांवर कारवाई करण्याचे धाडस महापालिका आयुक्त दाखवणार आहेत का, असा सवालही राणे यांनी यावेळी केला. खरे तर महापालिकेला मुख्य मालकांवर कारवाईच करायची नाही. केवळ कारवाईचा फार्स व नौटंकी सुरू ठेवायची आहे. अवैध बांधकामांबाबत काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे पुढे येत आहेत, तसेच राजकीय हितसंबंधांची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश किंवा आयएएस अधिका-यांमार्फत चौकशी करावी. पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी राणे यांनी केली. दरम्यान, या सर्व प्रकारावर सेना गप्प का आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापलिकेने अवैध बांधकामावर कारवाईसाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत कशासाठी देण्यात आली आहे? या कालावधीत केवळ सेटींग व डील होणार आहे. १५ दिवसानंतर काहीही निष्पन्न होणार नाही. सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार असाच सुरू राहणार आहे.महानगरपालिकेमार्फत हॉटेल्सला परवानगी देणे, अवैध बांधकाम करणे, त्यासंदर्भातील आवश्यक परवाने देण्याचे काम बाबा खोपटे ही व्यक्ती करत आहे. तोच सर्व व्यवहार करतो. त्याचे रेट कार्ड ठरलेले आहे. त्यामुळे या व्यक्तीची चौकशी करण्याची गरज आहे असेही राणे म्हणाले.
महापालिकेला जाब विचारण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली १५ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात स्वयं सेवी संघटना, माहिती अधिकार कार्यकर्ते, सोशल मीडियावर सक्रिय नागरीक सहभागी होणार आहे. या शिवाय सर्वच राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आमदार राणे यांनी केले. शिवाय महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने देखील या मोर्चाला पाठिंबा दर्शवला असून पक्षाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी राहतील.