छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
मुंबई : जिग्नेश मेवानीच्या कार्यक्रमाला पोलीसांनी परवानगी नाकारली असतानाही हा कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या असंख्य कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. विलेपार्ल्यामध्ये जमावबंदीच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. परंतु परवानगी नाकारण्यात आल्या नंतर सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतर येथिल जमाव पांगला आहे. छात्रभारतीचे कार्यकर्ते गोरेगावच्या दिशेने जात आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे येथे संघर्ष होणार अशी शक्यता होती. जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीसांची ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.