विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करा
सुनिल तटकरेंची मागणी
मुंबई : गेल्या तीन दशकापासून देशासह राज्याच्या विकासामध्ये योगदान असलेल्या शरद पवार यांच्बयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हितचिंतकाने फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु केली आहे. त्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाचा आम्ही धिक्कार करत असून, त्याच्याविरोधात न्यायालयीन कारवाई केली जाणार आहेच शिवाय मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
शरद पवार यांच्या ५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. अगदी खलिस्तानच्या चळवळीपासून राष्ट्रीय पातळीवर जेव्हा-जेव्हा समस्या निर्माण झाल्या त्या-त्यावेळी शरद पवार यांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्या समस्या सोडवण्यामध्ये शरद पवार यांचे योगदान मोठे राहिले आहे. गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती आली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली या देशात दुसरी कृषीक्रांती घडवण्याचे काम शरद पवार यांनी केले त्यांच्याबद्दल असे विकृत मनोवृत्तीची पोस्ट टाकण्यात आली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी संताप व्यक्त केला. फेसबुकवर आलेल्या त्या आक्षेपार्ह पोस्टबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली आहेच शिवाय पक्षाच्यावतीने यावृत्तीविरोधात कडक पावले उचलली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला भीमा कोरेगावमध्ये जी घटना घडली त्याबद्दल दु:ख होत आहे. काही जातीयवादी लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण तयार केले. त्यामुळे आता परस्परातील सामंजस्य राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले. सरकारने न्यायालयीन चौकशी सुरु केली आहे. मात्र राज्याचे गृहराज्यमंत्री सोशल मिडियाला दोष देत बसले आहेत. त्याअगोदर खोलात जावून चौकशी करायला हवी होती त्यावेळी केली नाही आणि आता अपयश आल्यावर दुसऱ्यावर खापर फोडले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याची आवश्यकता होती परंतु तसे करण्यात आले नाही असेही तटकरे म्हणाले.