कुंभारवाडा,कामाठीपुरा पुनर्विकासाचा प्रस्तावा आल्यास महिन्यात मान्यता
रवींद्र वायकर यांची माहिती
मुंबई : मुंबईतील कुंभारवाडा भंडारी स्ट्रीट, कामाठीपुरा, दुर्गास्ट्रीट येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची आज गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पाहणी केली. या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांचा प्रस्ताव आल्यास त्यास एक महिन्याच्या आत मान्यता देण्यात येईल, असे वायकर यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर वायकर यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, येथील नागरिकांनी परिसराला भेट देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार पाहणी करण्यात येत आहे. या परिसरातील १०० वर्षापूर्वीपासून या खासगी इमारती आहेत. येथील जागेचा विचार करता मोडकळीस आलेल्या इमारतींचा एकत्रित विकास करणे सोयीचे होणार आहे. त्यादृष्टीने या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी येथील रहिवाशांनी स्वत: विकासक नेमून करावयाचा की म्हाडा मार्फत पुनर्विकास करायचा याबाबत सर्व रहिवाशांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावा. त्यांचा निर्णय झाल्यास आणि त्यांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केल्यास त्यांच्या प्रस्तावास एका महिन्याच्या आत मान्यता देण्यात येईल. म्हाडामार्फत पुनर्विकास करावायाचा झाल्यास बीडीडी चाळीप्रमाणे या इमारतींचा पुनर्विकास करता येईल. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेल्या निर्णयांचा येथील नागरिकांना लाभ घेता येईल. इमारतींचा पुनर्विकास ३३/७, ३३/९ अंतर्गतसुद्धा विकास करता येईल. येथील दुकान गाळाधारक व पार्किंगसाठी पहिले मजले देता येऊ शकतील व त्यापुढील एफएसआय रहिवाशांसाठी वापरता येईल. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा येथील परिसराचा सर्वे करावा, अशा सूचनाही वायकर यांनी यावेळी दिल्या.