संभाजी भिडे यांचे मुंबईतील व्याख्यान रद्द
मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लालबाग येथे ७ जानेवारी रोजी संभाजी भिडे यांचे आयोजित केलेले व्याख्यान मुंबई पोलीसांनी परवानगी नाकारल्याने पुढे ढकलण्यात आले आहे.
भिडे गुरूजींचे येत्या ७ जानेवारीला लालबाग येथे होणा-या व्याख्यानमालेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने ते रद्द करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पण कायदा सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई पोलीसांनी या व्याख्यानमालेला परवानगी नाकारल्याने व्याख्यान रद्द करण्यात आले असल्याची माहिती श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई विभाग प्रमुख बळवंत दळवी यांनी आज दिली आहे.
लालबाग येथिल मेघवाडीत येत्या ७ जानेवारीला आयोजित करण्यात आलेले भिडे गुरूजींचे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे. या व्याख्यानाला साधारणतः १० हजार लोक येण्याची शक्यता होती. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेमुळे मुंबईचे वातावरण गढूळ झाले आहे. मराठा, ब्राम्हण आणि दलित अशी फूट पाडण्याचा प्रयत्न समाज विघातक संघटना करत आहेत असा आरोप दळवी यांनी यावेळी केला. पोलिसांनी केलेल्या विनंतीमुळे ही व्याख्यानमाला पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगत खरा सूत्रधार सापडल्यावर पुन्हा व्याख्यान आयोजित केले जाईल अशी माहिती दळवी यांनी दिली.