महाराष्ट्रात ९२ टक्के नागरिकांकडे आधार कार्ड
नवी दिल्ली : डिसेंबर २०१७ अखेर देशात ८८.५ टक्के नागरिकांना आधार कार्डाचे वितरण झाले आहे. तर महाराष्ट्रात ९२.६ टक्के नागरिकांना आधार कार्ड वितरित झाली आहे.
देशातील ११६ कोटी ५४ लाख २८ हजार ३७७ नागरिकांना ३१ डिसेंबर २०१७ अखेर आधार कार्ड देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात ११ कोटी ७९ लाख १ हजार १८९ नागरिक आधार कार्डाशी जोडली गेली आहेत, हे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ९२.६ टक्के इतके आहे.राज्यातील पाच वर्षांखालील ९९ लाख ६२ हजार ६०३ बालकांपैकी डिसेंबर २०१७ अखेर ४० लाख ९० हजार १५२ बालकांची आधार आधार नोंदणी झाली आहे, हे प्रमाण ४१.१ टक्के इतके आहे. देशातील ४३.५ टक्के बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. देशातील पाच वर्षांखालील १२ कोटी २९ लाख ५८ हजार ७४९ बालकांपैकी ५ कोटी ३४ लाख ७५ हजार ४३४ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पाच ते अठरा वयोगटातील २ कोटी ९५ लाख ९ हजार ४८६ किशोरवयीन युवकांना २ कोटी ३९ लाख ६ हजार ८९७ युवकांना आधार कार्ड देण्यात आली आहेत. राज्यातील आधार नोंदणीचे हे प्रमाण ८२.६ टक्के इतके आहे. देशातील ३६ कोटी १० लाख ५४ हजार ३६९ पाच ते अठरा वयोगटातील बालकांपैकी २७ कोटी ६७ लाख ४२ हजार ३२७ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे, देशपातळीवरील आधार नोंदणीचे हे प्रमाण ७६.६ टक्के इतके आहे.