माणदेशी फाऊंडेशनचा माणदेशी महोत्सव दणक्यात संपन्न
मुंबई: माणदेशी फाऊंडेशन आयोजित माणदेशी महोत्सवाचे सूप रविवारी वाजले. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात ४ जानेवारी ते ७ जानेवारी असा चारदिवसीय हा महोत्सव रंगला होता. या महोत्सवात माणदेशीच्या ग्रामीण बाजाचे, महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे, कलाकारांच्या कलागुणांचे आणि खास माणदेशी महिलांच्या कुस्तीचे सादरीकरण पहावयास मिळाले. “मुंबईकरांनी या महोत्सवास प्रचंड प्रतिसाद देऊन या माणदेशी भगिनींचं जे कौतुक केले आहे त्याबद्दल मी मुंबईकरांची ऋणी आहे. मुंबईकरांनी महोत्सवास दिलेली भेट या महिलांसाठी उत्साहवर्धक आहे”, अशा शब्दांत माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी मुंबईकरांचे आभार मानले. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, इनोव्हेशन ऍण्ड स्पेशल प्रोजेक्ट विभागाच्या प्रमुख वंदना भन्साली, इव्हेण्ट मॅनेजमेन्ट संचालिका उज्वल सामंत यांनी प्रचंड मेहनत घेतली.
चार जानेवारी रोजी महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. याप्रसंगी चेतना सिन्हा यांचे ‘छावणी एक भागीरथी प्रयत्न’ या पुस्तकाचे अनावरण आशुतोष गोवारीकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. २१ एप्रिल २०१२ ते १६ सप्टेंबर २०१३ या दीड वर्षांत १२९३६ गुरांसाठी आणि ३ हजार कुटुंबाची चारा छावणी माणदेशी फाऊंडेशनने चालवली होती. या छावणीला कॅमेऱ्यात कैद करुन ते पुस्तकरुपाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. जेष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहीली आहे.दुसऱ्या दिवशी सायंकाळी माणदेशी महिलांच्या कुस्त्यांचा फड गाजला. ९ ते २२ वर्षे वयोगटातील मुलींनी चित्तथरारक कुस्तीच्या डावपेचांचे दर्शन घडविले.
तिसऱ्या दिवशी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महोत्सवास सदिच्छा भेट दिली. ग्रामीण भागातील महिलांना बचतीचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच विमा आणि इतर गुंतवणूकीच्या मार्गाद्वारे त्यांना अर्थसाक्षर करण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनने अर्थसाक्षर बस सुरु केली आहे. या बसचे लोकार्पण चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. यावेळी पाटील यांनी महोत्सवातील ९० दालनांना भेटी दिल्या. महोत्सवात सहभागी झालेल्या कुंभारांच्या दालनात पाटील यांनी स्वत: मडके तयार केले.माणदेशी फाऊंडेशन ‘माणदेशी तरंग वाहिनी’ नावाचे रेडिओ वाहिनी चालविते. या रेडिओच्या कलाकारांनी भारुड, ओवी, अभंग, पोवाडा सारख्या माध्यमांद्वारे महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित असलेल्या राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई आणि एशियन फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी या कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक केले.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महोत्सवास भेट दिली. माणदेशी फाऊंडेशनच्या ‘माणदेशी महोत्सवा’चे त्यांनी कौतुक केले. तसेच महिला सबलीकरण आणि ग्रामीण विकास या विषयांवर माणदेशी फाऊंडेशन सोबत एकत्र काम करण्याचा निर्धार अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी कुंभाराच्या चाकावर मडकं तयार करण्याचा आनंद अमृता फडणवीस यांनी घेतला. अनेक वर्षांची इच्छा माणदेशी महोत्सवामुळे पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.गेल्यावर्षी तब्बल २० हजार मुंबईकरांनी माणदेशी महोत्सवास भेट दिली होती. यंदा ही संख्या दुप्पट झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.