मुंबईत १२ जानेवारीपासून ‘मुंबई शॉपींग फेस्टीव्हल’

मुंबईत १२ जानेवारीपासून ‘मुंबई शॉपींग फेस्टीव्हल’
मुंबई :  मुंबई शहराला जगातील एक प्रमुख शॉपींग डेस्टीनेशन म्हणून पुढे आणण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत येत्या १२ ते ३१ जानेवारी दरम्यान मुंबई महानगर क्षेत्रात  विविध उपक्रमांनी युक्त अशा ‘मुंबई शॉपींग फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. या काळात देश – विदेशातील पर्यटकांना मुंबईत आकर्षित करुन मुंबईतील शॉपींग कल्चरला चालना दिली जाणार आहे. याबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रमही या कालावधीत आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रावल म्हणाले की, मुंबईतील व्यापार, पर्यटन आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून  देश – विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित केले जाईल. मुंबईतील विविध हॉटेल असोसिएशन, रेस्टॉरंट असोसिएशन, एअरलाईन्स, ट्रॅव्हल कंपन्या, शॉपींग मॉल्स, पर्यटनविषयक कंपन्या, किरकोळ विक्रेते आदींच्या सहयोगातून हा महोत्सव होणार असून त्यांनी या काळात त्यांच्या विविध सेवांवर ४० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती देण्याची तयारी दर्शविली आहे, असे त्यांनी सांगितले.
या महोत्सवाला जागतिक पातळीवर पोहोचवून जगभरातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून या महोत्सवाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली आहे, अशी माहितीही मंत्री रावल यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, या काळात नाईट बाजार ही एक वेगळी संकल्पना राबविली जाणार आहे. वरळी येथे १३ आणि १४ जानेवारी रोजी, मालाड येथे १९ आणि २० जानेवारी रोजी तर पवई येथे २६ आणि २७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हे नाईट बाजार खुले असतील. याच ठिकाणी या दिवशी फू़ड ट्रक्स असोसिएशनच्या सहयोगाने खाऊ गल्लीसारख्या उपक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील विविध १३ ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही महोत्सव काळात आयोजन करण्यात आले असून त्यात विविध प्रकारचे साधारण ५०० कार्यक्रम होतील. या माध्यमातून मुंबईच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याला चालना दिली जाणार आहे. तसेच १४ जानेवारी रोजी वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ गार्डन येथे कलर रनचेही आयोजन करण्यात आले आहे. शॉपींग महोत्सवात सहभागी होणाऱ्या ग्राहकांना सवलतींबरोबर विविध प्रकारची बक्षीसेही दिली जाणार आहेत.
Previous articleनगराध्यक्षांवर पहिली अडीच वर्षे अविश्वास ठराव आणता येणार नाही
Next articleविशाल कारिया, बाळा खोपडेची सीबीअाय चौकशी करण्यात यावी – नितेश राणे यांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here