गिरिश बापट हे वास्तवाची जाण असणारे नेते
इंदापूर : वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचे आहे, ते आत्ताच मागून घ्या, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरिश बापट यांनी केल्यानंतर त्याच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून समाचार घेतला जात असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव असून, त्यांनी केलेल्या वक्तव्याचे स्वागत करते, असे त्यांनी आज इंदापुरमध्ये म्हटले आहे.
वर्षभरानंतर सरकार बदलणार असल्यामुळे जे काही मागायचे आहे, ते आत्ताच मागून घ्या, असे वक्तव्य मंत्री गिरीश बापट यांनी पुण्यामध्ये केले होते.त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या या वक्तव्याचे स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती फक्त बापट यांच्याकडेच आहे. त्यानी केलेले वक्तव्य हे वास्तव लक्षात घेऊन केलेले आहे. त्यामुळेच मी त्यांचे मनापासून स्वागत करते.पुढे कोणाचेही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणे हे त्यांचे कर्तव्य असेल. त्यामुळे जे काही मागायचे असेल, ते आत्ताच मागून घ्या, असेही बापट म्हणाले होते.